अमानुष! पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती ‘डेडबॉडी’ शेजारी खेळत बसला मोबाइलवर गेम

जोधपूर । राजस्थानमधील जोधपूर येथे रविवारी रात्री एकाने आपल्या पत्नीची हत्या केली. धक्कादायक  बाब म्हणजे पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची माहिती दिली. इतकच नाही तर आपल्या सासऱ्यालाही फोन करून तुमच्या मुलीची हत्या केली आहे, असे सांगितले. याहून भयंकर म्हणजे घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी पती त्याच्या पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून मोबाइलवर गेम खेळत होता.

पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी पतीला अटक केली आहे. विक्रमसिंह असे आरोपीचे नाव आहे. तर शिव कंवर असे मृत पत्नीचे नाव आहे. कैची भोसकून पत्नीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. त्याला झटके येतात. रात्री अचानक झोपेतून जागे झाल्यानंतर पत्नीची हत्या केली. मात्र, मुलांना आईवाचून पोरके केले, याची सकाळी पोलीस ठाण्यात जाणीव झाली, असा दावा आरोपीने केला.

या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. आरोपीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. घरातील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. विक्रमसिंहचे कुटुंब मूळचे फलोदी येथील राहणारे आहे. बीजेएस कॉलनीत त्यांचे घर आहे. बऱ्याच वर्षांपासून ते या ठिकाणी राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी बेरोजगार होता. पत्नी घरी शिवणकाम करत होती. त्यानंतर एका स्टोअरमध्ये तिने नोकरी केली. मिळालेल्या पैशांतून ती घर खर्च चालवायची. मात्र, पत्नी नोकरी करत असल्याचा राग त्याच्या मनात होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’