लग्नाआधी होणाऱ्या पतीकडून लाखोंची शॉपिंग करत नवरी फरार; फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवरोबाची पोलिसांत धाव

नवी दिल्ली । लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक हैराण करणारी घटना लखनऊमध्ये घडली आहे. होणाऱ्या बायकोने लग्नाआधी नवरदेवालाच लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. नवरदेवाने होणाऱ्या बायकोसाठी तब्बल 6 लाखांची शॉपिंग केली पण त्यालाच गंडा घालून नवरीने पळ काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी तरुणाचं लग्न होणार होतं. मात्र त्याआधीच एक तरुणी त्याला लुटून फरार झाली आहे. मनोज अग्रवाल असं तरुणाचं नाव असून मेट्रोमोनियल वेबसाईट जीवन साथी डॉट कॉमच्या माध्यमातून त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली होती.

लखनऊमध्ये राहणाऱ्या मनोज अग्रवालने लग्नासाठी जीवन साथी डॉट कॉमवर आपलं प्रोफाईल तयार केलं होती. यादरम्यान 15 ऑगस्ट रोजी प्रियंका सिंह नावाच्या मुलीची त्याला रिक्वेस्ट आली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद होऊ लागला. मनोजने दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने त्याला ती बिहारची राहणारी आहे आणि तिच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे. तसेच ती आपल्या मावशीसोबत राहते आणि दिल्लीत शिक्षण घेत असल्याचं सांगितलं. मनोजच्या कुटुंबियांनी आणि प्रियंकाच्या मावशीने चर्चा करुन दोघांचं लग्न ठरवलं. मात्र याच दरम्यान तिने मनोजला यूपीएससीची तयारी करत असल्याचं देखील सांगितलं.

मनोजने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससीची तयारीचं कारण देत तरुणीने पैसे मागण्यास सुरुवात केली. अभ्यासाच्या नावाखाली कधी 10 हजार, कधी 20 हजार तर कधी 50000 रुपये मागत होती. आपली होणारी पत्नी म्हणून तो तिला पैसे देत राहिला. अशा प्रकारे तरुणाने घरासाठी जमा केलेले तब्बल 6 लाख रुपये तिच्यावर खर्च केले. गेल्या 6 महिन्यांपासून दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू होतं. दोघं नियमित भेटतही होते. यादरम्यान 16 डिसेंबर रोजी लग्नाची तारीख ठरवण्यात आली. मनोज खूप खूश होता आणि आपल्या लग्नाची तयारी करू लागला.

तरुणी जेव्हा त्याला भेटायला लखनऊ यायची तेव्हा तिच्या येण्या-जाण्याच्या विमानाच्या तिकिटाचे पैसेही मनोजनेच दिले. त्याने मॉलमध्ये तिच्यासाठी तब्बल 2 लाखांची शॉपिंग देखील केली. हैदराबादला जात असल्याचं सांगून ती सध्या फरार झाली आहे. तिचा फोनही बंद आहे. मनोजने जेव्हा प्रियंकाने दिलेले आधार कार्ड, पॅन कार्डचा तपास केला तेव्हा ते बनावट असल्याचं समोर आलं. तरुणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठले आणि तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like