सातारा | नागठाणे- सासपडे रस्त्यावर असलेल्या मंगल कार्यालयाचे गेट उघडण्यास नकार दिल्याने एकाने दारूच्या नशेत वॉचमनच्या डोक्यात दगड घातला. डोक्यात दगड घातल्याने वॉचमन गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी युवकांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकराव रामचंद्र उंबरे (वय- 52, रा.बोरगाव, ता. सातारा) असे जखमी वॉचमनचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय ढाणे (रा. नागठाणे, ता.सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिकराव उंबरे हे नागठाणे- सासपडे रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात वॉचमन म्हणून कामाला आहेत. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या पाठीमागे राहावयास असलेला अक्षय ढाणे हा दारूच्या नशेत गेटवर आला. त्याने उंबरे यांना गेट उघडण्यास सांगितले.
‘तुम्ही दारू पिलेला आहात,’ असे सांगून उंबरे यांनी गेट उघडण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अक्षय याने गेटजवळील दगड उचलून उंबरे यांना मारला. दगड डोक्यात लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. याची माहिती अन्य कर्मचाऱ्यांना समजल्यावर त्यांनी जखमी झालेल्या उंबरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बोरगाव पोलिस ठाण्यात अक्षय ढाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार रामचंद्र फरांदे पुढील तपास करत आहेत