Tuesday, June 6, 2023

पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास पिस्टलसह अटक, कराड- पाटण रोडला कारवाई

कराड | रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास पिस्टलसह अटक करण्यात आली आहे. साकुर्डी (ता. कराड) येथे कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. संबंधित आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रफुल्ल निवृत्ती निकम (वय 38, रा. साकुर्डी ता.कराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध शस्त्रे पकडण्याची मोहीम सुरू आहे. या अंतर्गत कराड तालुका पोलीस ठाण्याचे स. पो. नि.सखाराम बिराजदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमलदार सज्जन जगताप, उत्तम कोळी , सचिन निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार त्यांनी साकुर्डी फाटा पेट्रोल पंपाजवळ रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार प्रफुल्ल निकम यास पिस्टलसह अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे.

आरोपी हा कराड तालुका पोलीस स्टेशन तसेच पाटण पोलीस स्टेशन येथील अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर गुन्हे दाखल आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील कराड तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स. पो. नि. सखाराम बिराजदार, पोलीस अमंलदार सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम यांनी ही कारवाई केली असून अधिक तपास सपोनि बिराजदार हे करीत आहेत.