तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुंड बंड्या दडगेला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
स्थानिक गुन्हे विभागाने पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार बंडोपंत उर्फ बंड्या अप्पासाहेब दडगे याला तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. गुंड बंड्या दडगे याला ६ महिन्यासाठी सांगली व कोल्हापूर या २ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.
काल मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक सांगली शहरातून गस्त घालत असताना ६ महिन्यासाठी तडीपार करण्यात आलेला गुंड बंड्या दांडगे हा सांगली शहरातून फिरत असल्याचे दिसले. त्याला ६ महिन्यासाठी सांगली व कोल्हापूर या २ जिल्ह्यातून १० एप्रिल २०१९ रोजी तडीपार करण्यात आले होते. तो तडिपारीचा आदेश न जुमानता सांगली शहरातून फिरत होता.
पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांनी त्यास ताब्यात घेऊन तू कोणाच्या परवानगीने शहरांत आला आहेस अशी विचारणा केल्यावर त्याने कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, अमित परीट, युवराज पाटील, अरुण औताडे यांनी केली.

Leave a Comment