ठाणे प्रतिनिधी । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी मागील चार वर्षापासून तुरुंगात असलेला आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश कदम घोडबंदर रोडवरील एका फ्लॅटमध्ये ठाणे पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याच फ्लॅटमध्ये आणखीन एक व्यक्ती होता. धक्कादायक बाब म्हणजे या फ्लॅटमधून लाखो रुपायांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही कदम दुसरीकडे गेलाच कसा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
न्यायालयीन कोठडीत असलेला रमेश कदम हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून सध्या त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस बंदोबस्तात मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी येत्या सोमवारी पुन्हा उपचारासाठी घेऊन येन्याबाबत सांगितले. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात कदमला ठाणे कारागृहात आणले जात होते. मात्र पोलिस एस्कॉर्ट पथकाच्या प्रभारी अधिकारी यांनी कदम याला कारागृहात घेऊन न जाता खासगी गाडीने घोडबंदर रोडवरील ओवळा येथील पुष्पांजली रेसीडन्सी या सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये आणले होते. याची माहिती पोलिसाना मिळाल्यानंतर पोलिसानी फ्लॅटमध्ये छापा मारला असता या ठिकाणी रमेश कदम आणि राजू खरे हे दोघे ५३ लाख ४६ हजार रुपयासह मिळून आले.
दोन हजाराच्या २ हजार ५४८ आणि ५०० रुपायांच्या ५०० नोटा असून खरे याने ही रक्कम आपल्याच मालकीची असल्याचे सांगितले असून विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी त्याने ही रक्कम जमवली असल्याचेही समोर आले आहे. या रकमेबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून खरे याला पुढील चौकशीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता ठाण्यातील आयकर विभागाच्या कार्यालयात कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. ही रक्कम ट्रेझरी मध्ये जमा करण्यात आली आहे.