मगर नदीत मुलाचा मृतदेह घेऊन फिरत होती..रेस्क्यू टीमनं असं केलं ओपरेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

मौजे डिग्रज येथे काल दुपारी नदीपात्रात मगरीने हल्ला करून ओढून नेलेल्या आकाश मारुती जाधव या मुलाचा मृतदेह आज दुपारी नदी पात्रामध्ये एक किलोमीटर अंतरावर सापडला. वनविभाग आणि सांगलीच्या रेस्क्यू टीमने मुलाच्या मृतदेहाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले. मगरीने कुर्तडलेला मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.
मौजे डिग्रज येथील बाळासाहेब लांडे यांच्या शेतात नदी काठावर विटभट्टीवर काम करणारे मजूर राहतात. त्यापैकी कर्नाटकातील विजापूर येथील मारुती जाधव हे आपल्या कुटुंबासह काम करतात. त्यांच्या दोन मुली व मुलगा आकाश आपल्या मूळ गावाहून आई-वडिलांकडे सुट्टीसाठी आले होते. गुरुवारी दुपारी दीड वाजता मारुती जाधव यांची पत्नी आपल्या मुलांसमवेत नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. आकाश हा जवळच आंघोळ करीत होता. यावेळी अचानक आकाशवर मगरीने हल्ला केला. मात्र, त्याच्या आईला काहीच करता आले नाही. स्वत:च्या डोळ्यादेखत मुलावर झालेल्या हल्ल्याने त्यांची भंबेरी उडाली. त्यांच्या आरडाओरड्याने विटभट्टीवरील लोकांनी नदीकडे धाव घेतली. पोलिसपाटील सतीश पाटील यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. वनक्षेत्रपाल एम.व्ही.कोळी, वनरक्षक आर. एस.पाटील, जाधव, वनपाल सर्जेराव साळुंखे आदींनी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने शोध सुरू केला. यावेळी नदीपात्रात मगर मुलाला घेऊन फिरत होती. मृत मुलाला मगरीच्या जबड्यातून सोडविण्यासाठी बोटीच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यात अपयश आले. काल सायंकाळी उशीरा आकाशचा मृतदेह सोडून मगर पाण्यात बुडाली, मात्र मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी पुन्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्पेशल रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरु केली. जिथे मगरीने मृतदेह सोडला होता तेथेच आज सकाळी मृतदेह दिसून आला.

अक्षाचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या जवानांनी यांत्रिक बोटीच्या साहाय्याने बाहेर काढला. मगरीने हल्ला करून कुर्तडलेला मुलाचा मृतदेह पाहून आकाशच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थित लोकांचेही डोळे पाणावले होते. दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे विटभट्टी कामगार, दोन्ही डिग्रज गावांबरोबरच नदीकाठावरील गावात भितीचे वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या मगरीच्या हल्ल्यामुळे वन विभागाने या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave a Comment