कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडच्या प्रितीसंगम घाटापासून काही अंतरावर मगरीचे दर्शन स्थानिक नागरिकांना झाले. गोटे व सैदापूरकर गावच्यामध्ये असलेल्या कृष्णा नदीपात्रात पोहणारी मगर मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. आटके, टेंभू, खोडशी गावानंतर आता टेंभू- सैदापूरकरांना नदीपात्रात मगरींचे दर्शन झाले. कोयना- कृष्णा नदीत दिवसेंन दिवस मगरींची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
कराड तालुक्यात कोयना- कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन वारंवार घडू लागले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी टेंभू येथे मोठ्या मगरीचे दर्शन झाले होते. त्यानंतर खोडशी येथेही तब्बल 10 फुटी मगर चक्क रस्त्यावर पाहायला मिळाली. वनविभाग आणि रेस्क्यू टीमने 10 फुटी मगर पकडली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच कराडच्या प्रितीसंगमापासून काही अंतरावर गोटे- सैदापूर येथील नागरिकांना कृष्णा नदी पात्रात मगरीचे दर्शन झाले. मगरीच्या वावरामुळे कराड तालुक्यातील नदीकाठच्या गावात भितीचे वातावरण आहे.
मगरीचे दर्शन घडू लागल्याने नदीकडे जाणाऱ्या शेतकरी व पोहायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सोमवारी प्रितीसंगमापासून काही अंतरावर मगरीला नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. दरम्यान मगरींचे दर्शन घडत असल्यामुळे कृष्णा कोयना काठावर मगरीची दहशत जाणवत आहे.