औरंगाबाद | लॉकडाऊनमध्ये कोरोना काळात शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये म्हणून शाळांकडून कोरडा शिधा देण्यात येत होता. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण आहारा ऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) च्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्याचे आदेश राज्य शासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे करुणा काळात बँकेत पालकांची गर्दी वाढली असून विद्यार्थी व पालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळावा, म्हणून कोरडा शिधा वाटप करण्यात येत होता. मात्र आता धान्य न देता पोषण आहार योजनेचा निधी बँक खात्यात जमा केला जाणार आहे. राज्यात एकीकडे सर्वात घातक ठरलेल्या कोरोना डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका गृहीत धरून सरकारने पुन्हा राज्यात नवीन निर्बंध लागू केले आहेत.
जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी ‘ब्रेक द चेन’चे निर्बंध शिथिल केल्यामुळे जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळून येत आहेत. पुन्हा एकदा निर्बंध लागण्या अगोदर पालक आपल्या मुलांचे खाते उघडण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत. यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण
आहे.