हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनानं भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर CSK ला मोठा झटका बसला. कौटुंबिक कारण देत रैनाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, रैनाला मुलगी ग्रेसीया, मुलगा रियो आणि पत्नी प्रियंका यांच्या आरोग्याची काळजी होती, त्यामुळे तो भारतात परतला. मात्र चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांनी सुरेश रैनाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. एन श्रीनिवासन यांनी आरोप केला आहे की, कौटुंबिक कारणामुळे नाही तर आपल्या मनासारखी हॉटेल रूम न मिळाल्यामुळे रैनानं आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला.
चेन्नई सुपरकिंग्जचे मालक श्रीनिवासन यांनी आउटलूकशी केलेल्या खास मुलाखतीत असे सांगितले की, मनाप्रमाणे हॉटेल रूम न मिळाल्यामुळे रैनानं आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला. दुबईतील सुरेश रैनाच्या हॉटेल रूममध्ये बाल्कनी नव्हती. धोनीच्या खोलीत बाल्कनी होती. सुरेश रैनाला त्याच्या परिवारासाठी धोनीसारखी रूम हवी होती, पण जेव्हा तसे झाले नाही तेव्हा त्याने रागाने टीम सोडली आणि दुबईहून दिल्लीला परतला. आउटलुकच्या वृत्तानुसार सुरेश रैना आणि धोनी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर संघाचे मालक श्रीनिवासन यांनीही धोनीशी या विषयावर चर्चा केली.
रैनाचं असं तडकाफडकी माघार घेणं धक्कादायक आहे, पण संघाचे खेळाडू या धक्क्यातून लवकरच सावरतील. यशस्वी झाल्यावर काही लोकांच्या डोक्यात खूपच हवा जाते, त्यातला हा प्रकार आहे. पण संघातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. धोनी सारं काही सांभाळून घेऊ शकतो. प्रत्येक क्रिकेटपटू हा आपल्या संघाचं नेतृत्व करत असतो. चेन्नईचा संघ हा एका कुटुंबाप्रमाणे आहे, असंही श्रीनिवासन म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’