सातारा | अरबी उत्खनन करणारे ‘पी-३०५’ ही बार्ज (नौका) तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने ओएनजीसीचे जहाज भरकटल्याने बळी गेलेल्यांमध्ये कोरेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील विनोद भाऊसाहेब वाघ (वय ४५) यांचाही समावेश आहे. जहाजावर काम करीत असताना ते समुद्रात बुडाले. शुक्रवारी विनोद वाघ यांचा मृतदेह नौदलाच्या हाती लागला.
ओएनजीसी कंपनीच्या तेल उत्खनन प्रकल्पाचे काम एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर खासगी कंपनीकडे आहे. या कंपनीचे एकूण २६१ कर्मचारी मुंबईपासून १७५ किलोमीटर अंतरावरसमुद्रात काम करत होते. या कंपनीकडे असलेले बार्ज पी ३०५ हे जहाज त्या कामासाठी तैनात करण्यात आलेले होते. या कंपनीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये जाधववाडी (ता. कोरेगाव) येथील विनोद भाऊसाहेब वाघ हे कामास होते.
चक्रीवादळामुळे रात्रीच्या वेळी जहाजात पाणी शिरल्याने सर्वांनी लाईफ जॅकेट घालून खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. त्यातील काही जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले होते. मात्र, काही जण बेपत्ता होते. त्यांची शोधमोहिम सुरू होती. शुक्रवारी सकाळपासून असलेल्या शोधमोहिमेत दुपारच्या सत्रात जाधववाडी येथील विनोद वाघ यांचा मृतदेह हाती लागला. वाघ यांचे वडील व भाऊ गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत होते. त्यांना आपल्या विनोदच्या मृत्यूची बातमी समजल्यावर मोठा मानसिक धक्का बसला आहे. विनोद हे राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब वाघ यांचे ज्येष्ठ पुत्र होते. यांच्या पश्चात आई, वडील दोन भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
जहाजाच्या कॅप्टन विरोधात गुन्हा दाखल
अरबी उत्खनन करणारे ‘पी-३०५’ ही बार्ज (नौका) तौक्ते या चक्रीवादळाच्या तडाख्यात बुडाल्याने पन्नासजण मरण पावले असून आतापर्यंत एकूण ४९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी २६ जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. या दुर्घटनेप्रकरणी ‘पी-३०५’ या बार्जच्या कॅप्टन राकेश बल्लाव व इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.