तौक्ते चक्रीवादळ ः मुंबईत अनेक भागात वीजपुरवठा खंडित तर कोकणात 104 गावांना सतर्कतेचा इशारा

कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळादरम्यान वाहणारे वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता मुंबईत वर्तविण्यात आली आहे. त्यांचा परिणाम काही भागात जाणवू लागला आहे, मुलुंडमध्ये काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. मुंबई बरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांचा परिणाम पहाटे 2 वाजल्यापासून जाणवू लागल्याने 104 गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.  

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), दहिसर आणि मुलूंड येथील भव्य कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील 243, दहिसर कोविड केंद्रातील 183 आणि मुलूंड कोविड केंद्रातील 154 रुग्णांचा समावेश आहे. मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, अनेक भागात सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. काही भागात पावसाच्या सरीही कोसळत आहेत. मुलुंडमध्ये काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित.

रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा संभाव्य धोका दिसत असल्याने प्रशानाने अलर्ट जारी केला आहे. आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी करण्यात आली आहे. आज सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीत संचारबंदी केली आहे. किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांंना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. तौक्ते वादळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद दिसून आले आहेत. पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटलेला होता. रात्री 2 पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज गायब झाली असून किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस कोसळत होता.

नाशिक जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा, अफवांवर विश्वास  ठेवू नये ः जिल्हाधिकारी

नाशिक जिल्ह्याला चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा आपत्कालीन विभाग ही अलर्ट असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. तसेच प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याच केलं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात रात्री पासून ढगाळ वातावरण आहे.

You might also like