हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आता नवे वळण लागले आहे. दाभोळकर यांच्या हत्येचा आरोप निश्चित असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओखळलं आहे. त्यामुळे डॉ दाभोळकर यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा वाढली आहे.
साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी साक्षीदार हे पुलावर साफ सफाई करीत होते. त्याची महिला सहकारी त्यावेळी तेथे होती. काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाडरवर बसले होते. पुलाजवळील झाडावर एक माकड आल्याने आणि त्यामुळे कावळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या बाजूला पाहिले. तेव्हा त्यांना दोघांनी एकाला गोळ्या झाडल्या व त्यामुळे ती व्यक्ती खाली पडल्याचे पाहिले. गोळ्या झाल्यानंतर दोघे तरुण पोलिस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला.
साक्षीदार डॉ. दाभोलकरांच्या जवळ गेले तेव्हा डॉ. दाभोलकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर साक्षीदार चित्तरंजन वाटीकेत साफ सफा इसाठी निघून गेले होते, अशी माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. हा सर्व घटनाक्रम साक्षीदारांनी साक्षीदरम्यान न्यायालयास सांगितला. तसेच अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे न्यायालयास सांगितले. डॉ. दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने अॅड. ओंकार नेवगी या खटल्याचे कामकाज पाहत आहेत.
दरम्यान, पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोळकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोळकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असेही तपासात समोर आले होते