सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेली अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीची वाहतूक कमी होत आहे. अशात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने त्यांना एसटी अभावी प्रवास करण्यास अडचणी भासत आहेत. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील विद्यार्थ्यांना एसटी अभावी होत असलेल्या त्रासाबाबत आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तसेच विधार्थ्यांच्यातर्फे आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. परंतु एसटी बसेस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येणाऱ्या काळात विविध विभागाच्या परीक्षा सुरू होताहेत. परंतु बसेस सुरू नसल्याने परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहचू शकत नाहीत.
ग्रामीण भागातील बसेस फेऱ्या महामंडळाने बंद केलेल्या आहेत त्या पूर्ववत सुरू कराव्या. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे ते होणार नाही. कोविडच्या काळात अगोदरच दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तरी या गोष्टीचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी बससेवा पूर्ववत करणेत यावी किंवा विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेमध्ये बससेवा उपलब्ध करण्यात यावी, अशा या मुख्य मागण्यांचे निवेदन आगार व्यवस्थापक पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हासचिव ऍड. विलास चव्हाण, चैतन्य शिंगाडे, दादासाहेब माळवदे, शिवाजी बरकडे,शंकर जाधव, सागर महानवर, माजी चेअरमन आनंदराव वीरकर, विजय महानवर यांचेसह विवीध मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.