Thursday, March 30, 2023

सांगलीमध्ये वाढत्या महिला अत्याचाराविरोधात दलित महासंघाने केलं अनोखं कोंबडा आंदोलन

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज सांगलीतील स्टेशन चौकामध्ये दलित महासंघाने कोंबडा आंदोलन करीत नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात कोंबडा घेऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारी यंत्रणा आणि सरकारला जागे करण्यासाठी लक्षवेधी आंदोलन केले. दलित महासंघाच्या शहर अध्यक्षा अर्चना घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे, काही महिलांना जाळण्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यात मातंग समाजातील महिलेला घरात घुसून हल्ला करत तिला जिवंत जाळण्यात आले. तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मधील प्राध्यापिका युवतीला एका मातेफिरुने पेट्रोल टाकून एकतर्फी प्रेमातून जाळले. या घटना घडल्यामुळे महाराष्ट्र आजही असुरक्षित आहे. असा आरोप करत दलित महासंघाच्यावतीने सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. अन्याय अत्याचार होत असताना झोपी गेलेले प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे त्यांना जाग येण्यासाठी कोंबडा निदर्शने आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

कोंबड्याच्या अरवण्याने तर अधिकाऱ्यांना जाग येईल यासाठी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी हातात कोंबडा घेऊन सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी महिलांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत तात्काळ कठोर पाऊले उचलावीत, जळीतकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करून सदरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी कोंबडा निदर्शने करण्यात आली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.