सातारा : समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट gail omvdet यांचे वृद्धापकाळाने आज कासेगाव येथे निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार हाेणार आहेत. डाॅ. गेल या कष्टकरी जनतेसाठी अखेर पर्यंत कार्यरत राहिले. पती डाॅ. भारत पाटणकर bharat patankar यांच्या प्रत्येक चळवळीत त्यांचे याेगदान राहिले आहे.
डॉ. गेल ऑम्व्हेट यांचा जन्म अमेरिकेत येथे झाला. त्या साधारणतः ५० वर्षांपूर्वी भारतात आल्या. भारतात आल्यानंतर त्यांनी येथील सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यास केला. संशाेधन करीत असताना त्या कष्टकऱ्यांच्या चळवळींचा एक भाग बनून गेल्या.
त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला. त्यासाठी त्यांनी सामाजिक क्षेत्रात संघर्ष करणा-या, लढणाऱ्या माणसांच्या चळवळींचा वैचारिक पाया भक्कम केला. त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहिल्या. फक्त ज्ञानच नव्हे तर त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य कष्टकरी माणसांच्या चळवळीसाठी समर्पित केले.
जातिव्यवस्थेवर त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध माध्यमांतून आपले मत ठामपणे मांडले. भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, असा विचार त्यांनी मांडला आहे. विचार आणि व्यवहारात फारकत होणार नाही, याची त्यांनी नेहमी जाणीव ठेवली.
भारतात सुरु असलेल्या परिवर्तनाच्या चळवळीने भारावून गेलेल्या गेल यांनी शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे स्वप्न घेऊन कष्टकरी जनतेच्या लढ्यात झोकून देऊन, झपाटून काम करणाऱ्या डॉ. भारत पाटणकर यांच्यासोबत विवाह केला.