बंधाऱ्याचे काम पूर्ण ः पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भोसगाव -मोरेवाडी दरम्यान बंधाऱ्याचे अनेक वर्षे रखडलेले काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. या बंधाऱ्यामुळे वांग- मराठवाडी धरणातून व साखरी धरणातून सोडलेले पाणी अडविण्यात येणार असून या परिसरातील गावे, वाडया वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वांग मराठवाडी धरणाच्या प्रत्यक्ष कामाला 1997 साली सुरुवात झाली.
या धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कराड, पाटण तालुक्यातील शेहचाळीस गावे असून सहा हजार पाचशे हेक्टर जमीन ओलिताखाली आणि उद्दिष्ट आहे. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न, धरणग्रस्तांची आंदोलने, निधीचा तुटवडा यामुळे धरणाचे बांधकाम अनेक वेळा बंद झाले. आज तब्बल 23- 24 वर्षांनंतर या धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे चालले आहे. 2. 73 टीएमसी क्षमतेच्या धरणामध्ये 2011 साली अंशत घळभरणी करून 0.60  टीएमसी पाणीसाठा करण्यात येत होता. मात्र सध्या हा पाणीसाठा दुप्पट झाला असून काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होणार आहे.
धरणाखालील लाभक्षेत्राला धरणाच्या पाण्याचा लाभ देण्यासाठी  भांबुचीवाडी, भोसगाव, मालदन खळे, साईकडे ,मानेगाव , काढणे हे पाटण तालुक्यातील सात बंधारे तसेच अंबवडे, आणे, पोतले असे कराड तालुका हद्दीतील तीन असे एकूण दहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे प्रस्तावित होते. यापैकी बहुतांशी बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली असून भोसगाव- मोरेवाडी बंधाऱ्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते.  2012 -13 मध्ये तात्कालीन जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या भोसगाव बंधाऱ्याचे काम अनेक वर्षे अर्धवट अवस्थेत होते. तीन वर्षांपूर्वी या कामाला गती मिळाली बंधाऱ्याचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले आहे.
या बंधाऱ्यामध्ये वांग-मराठवाडी सह साखरी धरणाचे पाणी अडवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रात वाढ होणार असून या बंधाऱ्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबमुळे मोरेवाडी, पवारवाडी, पाचपुतेवाडी, जाधववाडी कुठरे, धामणी गावांना ढेबेवाडी बाजारपेठेत येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. या बंधा-यामध्ये येणाऱ्या पावसाळ्या नंतरच प्लेट बसविण्यात येणार असून पुढील उन्हाळ्यात बागायती क्षेत्रासाठी सिंचनाचा तसेच आजूबाजूच्या गावे वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शेतक-यांच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी ः रमेश पाटील
भोसगाव- मोरेवाडी बंधा-याचे काम पूर्णत्वास गेल्याने या परिसरातील गावे, वाड्या- वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतक-यांच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. त्याचबरोबर या परिसरातील लोकांना ढेबेवाडी बाजारपेठेत येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment