सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्या मध्ये रविवारी रात्री वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडाल्याने, प्रापंचिक साहित्य विस्कटून अनेकांचे संसार मोडून पडले. तालुक्याला सुमारे ७० लाख रुपयांचा अर्थिक फटका बसला आहे.
स्टेजिंगची तार तुटून मणेराजुरीत एक एकर द्राक्षबाग कोसळून जमीनदोस्त झाली. आंबा पिकाचेंही मोठे नुकसान झाले. तालुक्यातील अनेक गावामध्ये वादळी वा-यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. योगेवाडी येथे पोल्ट्री फॉर्म कोसळून अनेक पिल्ले मृत्यूमुखी पडली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरू केले आहेत. तालुक्यात २० हुन अधिक घरांचे पत्रे उडून पडझड झाली आहे.
रविवारी सायंकाळी सुटलेल्या जोरदार वादळी वारा व पावसामुळे तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, योगेवाडी, वायफळे, आरवडे, सावर्डे, लोढे, चिंचणी, अंजनीसह, सावळज , डोंगरसोनी, पेड यांसह अनेक गावातील घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले. यामध्ये घरगुती साहित्यासह शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.