चचेगाव येथील केळी बागेच्या नुकसानीची आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना जरी धडकले असले तरी राज्यातील इतर भागात सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा काही भागात वादळाचा फटका बसला आहे. कराड तालुक्यातील चचेगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सात एकरातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची पाहणी करण्याकरिता कराड दक्षिणचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चचेगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन नुकसान झालेल्या केळीच्या बागेची पाहणी केली.

यावेळी आ. चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली, केळी उत्पादन बाबत माहिती घेतली उत्पन्न निघायच्या वेळी निसर्गाने घाला घातल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत या शेतकऱ्यांना आधार देत आ. चव्हाण यांनी नुकसान झालेल्या केळीच्या बागेचे पंचनामे जलदगतीने करून शासनाकडे पाठवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. याची नुकसानभरपाई लवकरात लवकर शासन स्तरावर मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची सुद्धा ग्वाही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिली.

यावेळी त्यांच्यासोबत कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका कृषी अधिकारी मुल्ला, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, चचेगाव ग्रा.पं. सदस्य राहुल पवार, , अभिजीत चव्हाण, राहुल काळुखे यांच्यासह केळी उत्पादक हणमंत हुलवान, साहेबराव पवार, विलास पवार, संदीप पवार हे शेतकरी सुद्धा उपस्थित होते.