Wednesday, March 29, 2023

शाॅट सर्किटचा धोका : मेढा पोस्ट ॲाफीसमध्ये वस्तूंना हात लावताच बसतो शाॅक

- Advertisement -

मेढा | जावली तालुक्यातील मुख्य ठिकाण म्हणुन ओळख असलेल्या मेढा शहरातील पोस्ट कार्यालयाची इमारतीत पाणी गळती होत आहे. या गळतीमुळे विद्युत उपकरणांवर पावसाचे पाणी साचत असल्याने शॅार्ट सर्किटचा धोका निर्माण झाला आहे. मेढा पोस्ट ॲाफिसमधील कर्मचारी जीव मुठीत घेवून पाण्याच्या ओलाव्यात असुरक्षित काम करत असल्याच धोकादायक चित्र मेढा पोस्ट कार्यालयात पाहायला मिळत आहे. तसेच कर्मचारी व येणाऱ्या नागरिकांना वस्तूंना हात लावताच शाॅकचा अनुभव मिळत आहे. तेव्हा याकडे संबधित कधी लक्ष देणार असा सवालही केला जात आहे.

मेढा पोस्ट कार्यालयातील कागदपत्रे देखील भिजत आहेत. गत १० वर्षापासून मेढ्याच्या मुख्य चैाकातील धनावडे मार्केटमध्ये कार्यालय आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पोस्ट कार्यालयात पावसाच्या पाण्याची गळती ठिकठीकाणी होत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या टेबल व खुर्ची याच्यासह कार्यालयीन कम्प्युटरवर सुद्धा पाण्याच्या गळतीत भिजलेले आहेत. इलेक्ट्राॅनिक्स व इलेक्ट्रीक वस्तू हाताळताना कर्मचाऱ्यांना शाॅक बसत असून त्यांचा फटका सर्वसामान्य नागरीकांना सुद्धा शॅाकचा अनुभव आला आहे.

- Advertisement -

मेढा पोस्ट कार्यालयाची सध्याची जागा बदलण्याकरीता जिल्हा कार्यालयाकडून जागा शोधण्याचे काम सुरु आहे. मात्र त्याला अद्याप यश आले नाही. तेव्हा पोस्ट कार्यालयात एखाद्याचा जीव गेल्यावरच उपाययोजना होणार का ? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरीकांच्याकडून होत आहे.