सावधान: भेसळयुक्त अन्न खाताय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आरोग्य| अन्नभेसळीचे दुष्परिणाम अनेक आहेत.  रोज भेसळीचे अन्न पोटात जाऊन काही काळानंतर परिणाम दिसायला लागतात. काही वेळा मात्र ताबडतोब दुष्परिणाम दिसतात तर अन्न भेसळीमुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.

भेसळीची शंका आल्यास त्या भागातल्या अन्ननिरीक्षकाशी संपर्क साधावा किंवा राज्य सरकारच्या आरोग्य प्रयोगशाळांशी संपर्क साधावा. या प्रयोगशाळा औरंगाबाद, नागपूर, पुणे, सोलापूर,कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नाशिक, कोकण भवन, जळगाव आणि  सांगली येथे आहेत. शिवाय स्थानिक प्राथमिक आरोग्यकेंद्रे किंवा जिल्हा परिषदांचे आरोग्य अधिकारी यांच्या मार्फतही संपर्क साधता येईल.

अन्नभेसळीमुळे ब-याच लोकांना अपंगत्व आलेले आहे. तरीही भेसळ अखंडपणे चालूच आहे. भेसळीसंबंधी काही नेहमीची उदाहरणे आपण पाहूया.

 

  • दुधात पाणी मिसळणे किंवा त्यातील मलई काढून घेणे.
  • शुध्द तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे.
  • लोण्यात पाणी जास्त प्रमाणात ठेवणे (वजन वाढण्यासाठी)
  • हळद पावडरीत एक विषारी पिवळा रंग मिसळणे.
  • मिरची पावडरीत (लाल तिखट) लाकडाचा भुसा, विटांची पावडर किंवा इतर पावडर मिसळणे.
  • हिंग खडयाबरोबर (किंवा खडयाच्या ऐवजी) इतर खडे विकले जातात.
  • रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो.
  • धान्यामध्ये खडे, किडके धान्य यांचे प्रमाण जास्त असेल तर ती भेसळ समजा.
  • मोहरीमध्ये धोत-याचे बी मिसळले जाते व ते विषारी असते. (धोत-याचा दाणा एका बाजूला त्रिकोणी असतो व मोहरीपेक्षा साधारणपणे लहान असतो.)
  • चहाच्या पावडरीमध्ये लाकडाचा भुसा वा एकदा वापरलेली चहापूड मिसळतात.
  • डाळींना कृत्रिम रंग देऊन आकर्षक केले जाते. हे रंग अपायकारक असतात.
  • खाद्यपदार्थात धुण्याचा सोडा घातला जातो. त्यामुळे आतडयांना इजा होते.
  • खाद्यतेलात विषारी तेल मिसळल्यामुळे अपंगत्व येण्याची शक्यता असते.
  • अरगटयुक्त बाजरी विकणे हाही गुन्हा आहे व त्यामुळे विषबाधा होऊ शकते. (सूचना : मिठाच्या पाण्यात अरगटयुक्त बाजरीचे दाणे तरंगतात व चांगले दाणे खाली जातात)
  • पिठीसाखरेत सोडा मिसळला जातो.
  • बेसन पिठात लाखी डाळीचे पीठ (एक विषारी डाळ) मिसळले जाते.
  • जिरे किंवा बडेशेप यामध्ये गवताचे बी मिसळले जाते. (सूचना : जि-याच्या दाण्यांवर बारीक रेघा असतात)
  • लवंग, दालचिनी वगैरे मसाल्याच्या पदार्थाचा अर्क काढून घेतात व निःसत्त्व माल बाजारात विकला जातो, हीही एक प्रकारची भेसळच आहे.