औरंगाबाद | शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ तसेच नेहमी गजबजलेले असलेल्या औरंगपुरा भागातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या व्यंकटेश इलेक्ट्रीकल्समध्ये गुरुवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान धाडसी चोरी झाली. यात दिड ते दोन लाख रोख रकमेसह इलेक्ट्रॉनिक समान चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे इमारतीत लावलेले सीसीटीव्ही चोरट्यांनी वाकवून टाकले. एकंदरीतच या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहिती नुसार, औरंगपुरा भागात व्यंकटेश इलेक्ट्रीकल नावाचे संतोष जेथलिया यांचे होलसेल इलेक्ट्रोनिक पार्ट्सचे दुकान आहे. गुरुवारी नित्यव्यवसायाची रोख रक्कम दुकानात ठेवून चारच्या दरम्यान ते दुकान बंद करून घरी निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानात अंधार असल्याने चोरट्यांनी दुकानाच्या आत मध्ये स्वतःसोबत आणलेले कागद जाळले. त्यानंतर त्या प्रकाशात त्यांनी दुकानाचा गल्ला शोधून त्यातील अंदाजे दिड ते दोन लाखांची रोकड लंपास केली. तसेच इलेक्ट्रोनिकचे महागाचे साहित्य देखील चोरून तेथून पोबारा केला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याच इमारतीत असलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या लक्षात आले कि, व्यंकटेश इलेक्ट्रीकलचे शटर उघडे आहे. त्यानंतर त्यांनी जेथलिया यांना संपर्क केला. त्यांनी तात्काळ दुकानात धाव घेत, पोलिसांना बोलावले.
दरम्यान, दुकानाचे मालक जेथलिया यांनी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसल्यामुळे दुकानातील किती ऐवज चोरट्यांनी चोरून नेला हे कळू शकले नाही. पोलिसांनी सुरुवातीला पाहणी करत, श्वान पथकाला पाचारण केले. श्वान इमारतीच्या मागील गेट पर्यंत जाऊन घुटमळत तेथेच थांबले. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात दोन संशयित निष्पन्न झाले असून पोलीस त्यांच्याबद्दल माहिती काढत आहे. घटनास्थळी सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, गुन्हे शाखेचे सपोनि मनोज शिंदे यांच्यासह पथकाने भेट दिली.