कराड | वृध्द दाम्पत्याच्या असहाय्यतेचा फायदा घेत 72 वर्षीय वृध्देच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीचे 18 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अज्ञात भामट्याने जबरदस्तीने चोरुन नेले. शनिवारी 7 ऑगस्ट रोजी अंधाराचा फायदा घेत अज्ञात युवकाने सुनंदा शहा यांना रस्त्यातील खड्ड्यात ढकलून मंगळसूत्र तोडून पोबारा केला आहे. या घडलेल्या घटनेबाबत रविवारी दि. 8 रोजी शहर पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.
याबाबत सुनंदा उत्तमलाल शहा (वय- 72 रा. मसूर ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. शहा या वैद्यकीय उपचारांसाठी पती उत्तमलाल यांच्यासमवेत 7 ऑगस्ट रोजी शहरात आल्या आल्या होत्या. उपचार घेतल्यानंतर त्या सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मसूर बसने जाण्यासाठी पतीसोबत बसस्थानकात गेल्या. तेथे 25 ते 30 वर्षे वयाचा अनोखळी युवक त्यांना भेटला. त्याने मसूरला येणार असल्याचे सांगून सोबत जावू, असेही सांगितले.
सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास त्याने आता एसटी येणार नाही, आपण उर्दू शाळेजवळ जावून तेथून वडाप वाहनाने मसूरला जावू असे सांगितल्याने शहा दांम्पत्य त्याच्यासोबत उर्दु शाळेकडे चालत निघाले. वाटेत अंधाराचा फायदा घेत त्या युवकाने सुनंदा शहा यांना रस्त्यातील खड्ड्यात ढकलून दिले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारुन तोडून घेवून पोबारा केला. या घटनेबाबत शहा यांनी रविवारी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात युवकाविरुध्द गुन्हा नोंद केला. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला आहे.