दत्तात्रय नांद्रे, माजी पोलीस पाटील, देवजीपाडा
नमस्कार,मी दत्तात्रय पुंडलिक नांद्रे,रा. देवजीपाडा,ता.साक्री, जि.धुळे, गेल्या अनेक दिवसापासून मला बोलावसं वाटतं होतं.पण योग्य ती वेळ येत नव्हती.पण आज ती वेळ आलीय असे मला वाटते.गेल्या सात दिवसापासून गावात पाणी येत नाहीये आणि याप्रश्नी कुणी बोलतच नाही याचेच मला आश्चर्य वाटते आहे.खरं तर माझ्या ७५ वर्षाच्या आयुष्यात बरेच सरपंच,ग्रामसेवक आले आणि गेले पण कुणी या विषयावर शासन स्तरावर जोरदार प्रयत्न केलेत हे मी बघितले नाहीत.मुळात ग्रामपंचायत ही गावाच्या विकासासाठी की गाव भकास करण्यासाठी? हेच मला कळालेल नाही.
एक किस्सा आवर्जुन सांगावासा वाटतो.दिवंगत सुरेश उत्तम शेवाळे हे आमच्या गावाचे सरपंच असताना खासदार माणिकराव गावित यांच्या लोकनिधितून आणि भाजप गटनेते आदरणीय मोहन सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने आम्ही गावाला पाणी पुरवठा करणेकामी एका योजना आणली होती.मोठ्या आनंदात काम सुरू झाले आणि अगदी दहा फुटांवरच विहिरीला पाणी लागले आणि जवळपास चाळीस फूट विहिरीचे काम झाले.पण दुर्दैवविलास हाच की सुरेश शेवाळे यांची अचानक तब्बेत बिघडली आणि त्यांचा इहलोकीची प्रवास संपला.हा धक्का माझ्यासाठी सुद्धा खूप भयंकर होता.याच सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत काही विघ्नसंतोषी लोकांनीं परस्पर ती विहीर तर बळकावलीचं पण थेट जिल्हा परिषदेत जाऊन अर्जफाटा देऊन या कामाला ब्रेक आणला.
इतकेच कमी होते काय तर अगदी विहिरीच्या कामासाठी आणलेली खडी आणि विहिरीतून निघालेला गाळ सुद्धा या नालायक लोकांनी परस्पर विकून खाल्ला…हे सगळं कारस्थान करणारे कुणी परके नव्हते तर आपल्याच गावातील ग्रामपंचायतीच्या राजकारणात सतत हस्तक्षेप करणारे लोकं होते.यावर फक्त एक नोटीस द्यायची होती आणि पुढचा विषय लांबवता आला असता.पण असो माझा तो पिंड नाहीच.म्हणून मी गप्प बसलो.अशा कैक पाणीपुरवठा योजना आल्या आणि गेल्या.ज्या शेतात गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर खोदली ती त्या शेतमालकानेचं बळकावली.याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत.हे सगळं असचं चालत आलंय आजवर.म्हणून आमच्या गावात कुठलीही शासकीय योजना कधीच यशस्वी झालेली नाही आणि होणार देखील नाही.सोबतच प्रत्येक योजनेचे तेच बोगस ठेकेदार अतिशय दर्जाहीन काम करतात.त्यामुळे समजा कुठली योजना राबवली तर ती कधीच दर्जेदार राहत नाही हा तर नेहमीचाच अनुभव…
असो पण पाणी हा खूप महत्वाचा आणि जीवनावश्यक घटक म्हणून जे पाणी उपलब्ध आहे.त्याचे तरी नीट नियोजन करून गावाला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा ही अपेक्षा होती.पण चक्क सात दिवस झालेत पाण्याचा एक थेंब सुद्धा आम्हाला मिळालेला नाही.लोककल्याणकारी राज्यात आपण राहतोय ना ? कशाला ही ग्रामपंचायत ? कशाला हे लोकप्रतिनिधी ? या लोकांनी ही काय अवस्था करून ठेवलीय गावाची.आता हे सगळं सहन करण्यापलीकडे गेलय.अगदी डोक्याच्या पार पाणी गेलंय.यावर कुणीच काहीचं बोलत नाही म्हणजे सगळे मूग गिळून गप्प बसलेत.ग्रामसेवक महोदय समर्पक उत्तर देत नाहीत तर बीडीओ महोदय फोन घेत नाही…म्हणून या सगळ्यांवर काहीतरी करावं म्हणून मी पाणीपुरवठा मंत्री महोदयांना याविषयी बोललो आहे व बऱ्याच बाबींचा पाठपुरावा देखील केला आहे.इतके करूनही अतिशय उद्दिग्न होऊन मी हे पत्र लिहितोय… आणि या उद्दिग्न अवस्थेत एकच प्रश्न माझ्या मनात सतत येतोय.” माझ्या गावाचा पाणी प्रश्न सुटेल का ????