लेकीचा कारनामा ! शेजाऱ्यांच्या मदतीने जन्मदात्या बापालाच लावला चुना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागपुरातील बोरखेडी येथील एका तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या आजारी वडिलांना लाखों रुपयांचा चुना लावला आहे. या मुलीने बनावट स्वाक्षरीच्या मदतीने आपल्या वडिलांचं बँक खातं रिकामं केलं आहे. तिने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातील 7 लाख रुपयांची रक्कम स्वत:सह शेजाऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली आहे. आरोपी मुलीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, त्यांनी आपलं बँक खातं तपासलं असता हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीसह शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बुटीबोरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सिद्धार्थ रामदास गोंडाने असे तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते बोरखेडी येथील रहिवासी आहेत. सिद्धार्थ रामदास गोंडाने हे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी वगैरे मिळून त्यांना 22 लाख रुपये मिळाले होते. यातील पंधरा लाखांची त्यांनी एफडी केली होती. तर बाकीचे पैसे त्यांनी त्यांच्या खात्यात जमा केले होते. यादरम्यान एप्रिल 2021 मध्ये त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत ते रुग्णालयातच उपचार घेत होते.

याचवेळी आरोपी मुलगी शशिकला हिने या संधीचा फायदा घेत शेजारी टोनी थॉमस जोसेफ आणि त्याची पत्नी मोनिका थॉमस जोसेफ यांच्या मदतीने वडिलांच्या खात्यातील सात लाख रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. यानंतर काही दिवसांनी गोंडाने रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन खात्यावरील रक्कम तपासली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. तेव्हा त्यांच्या खात्यावर फक्त 27 हजार रुपये शिल्लक होते. या आरोपी मुलीने सात लाख रुपयांचं नेमकं केलं काय? आणि तिने शेजाऱ्यांच्या खात्यात पैसे टान्सफर कशासाठी केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. बुटीबोरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment