हजारो प्रवाशांचे प्रश्न मार्गी लागणार! आता दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले जाणार

Daund to Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांचे वेगाने काम करण्यात येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील महामार्गांसह अनेक नवीन रेल्वे स्थानके बनवून पूर्ण झाली आहेत. आता दौंड रेल्वे स्थानक (Daund Railway Station) पुणे विभागाला जोडण्याबाबत देखील रेल्वे मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे आता दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडले जाणार आहे. खरे तर, याचा सुप्रिया सुळे यांनीच पाठपुरावा केला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 1 एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडले जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या एका निर्णयामुळे आता हजारो प्रवाशांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. मुख्य म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून याचा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे सुप्रिया सुळे पाठपुरावा घेत होत्या. अखेर याला आज यश आल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून येत्या १ एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट रेल्वेमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा सुरु होता. यास यश आले असून, या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री मा अश्विनीजी वैष्णव यांचे मनापासून आभार”

तसेच, “दौंड येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे गैरसोयीचे आहे हे वेळोवेळी रेल्वे प्रशासन आणि मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिले होते. हा मुद्दा सभागृहातही उपस्थित केला होता. दौंडहून पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे अखेर रेल्वे मंत्रालयास पटले. दौंड तालुक्यातील मधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकही बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यास प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले असून आता यापुढे अडीअडचणींंसाठी सोलापूरला जाण्याची गरज भासणार नाही” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.