कातरखटाव येथे दिवसाढवळ्या घरफोडी : 35 तोळे सोन्यासह रोख रक्कमही लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खटाव | कातरखटाव (ता. खटाव) येथील भरवस्तीत असणारे एक बंद घर दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी तानाजीराव देशमुख यांच्या बंद घरातील सुमारे 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदी आणि रोख रक्कमही लंपास केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून घटनेची माहिती घेतली आहे. परंतु दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीमुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कातरखटाव येथे तानाजीराव देशमुख यांचे मुख्य रस्त्यावर केशव मेडिकल हे दुकान आहे. तर विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस दाट लोकवस्तीत केशव निवास हे दुमजली घर आहे. तानाजीराव देशमुख सकाळी मेडीकलमध्ये गेले होते. तर सौ. देशमुख या काही वेळानंतर घर बंद करुन मेडीकलमध्ये गेल्या होत्या. त्यांचा मुलगा तेजस हा काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरासमोर त्यांचे पाळीव कुत्रे बांधले होते. श्री. देशमुख दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी घरी आले तेव्हा त्यांना घराच्या दरवाजा उचकटलेला व त्याचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच त्यांचे कुत्रे देखील त्याठिकाणी निपचीत पडले होते. त्यावरून त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला.

तानाजीराव देशमुख यांच्या घरातील चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकले होते. चोरट्यानी सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने व 30 हजारांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर यांनी घटनास्थळी भेट देवून ठसे तज्ञ व श्वान कास पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.