Monday, January 30, 2023

प्रेयसीच्या भावाने फोन करून बोलावले, तीन दिवसांनी मिळाला तरुणाचा मृतदेह

- Advertisement -

समस्तीपूर : वृत्तसंस्था – बिहारच्या समस्तीपूरमधून तीन दिवसांपूर्वी एक तरुण अचानक गायब झाला होता. यानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव मिथिलेश कुमार असे आहे. मृत तरुणाचे गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होते त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मृत मिथिलेश 7 जूनपासून बेपत्ता होता.

हि घटना हसनपूर परिसरातील धोबौलिया गावातील आहे. मिथिलेश त्याच्या घरून तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 7 जूनला बेपत्ता झाला होता. मिथिलेश बेपत्ता झाल्यानंतर त्याचे वडील चंद्रशेखर राम यांच्यासह नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. तो कुठेच सापडला नाही म्हणून कुटुंबियांनी अखेर 9 तारखेला पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता गुरुवारी मिथिलेशच्या घरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर काही जणांना गावातील शाळेच्या मागे कालव्यात एक मृतदेह आढळला. याबद्दल ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर मिथिलेशचे कुटुंबीय त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तो मृतदेह मिथिलेशचा असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

हि हत्या मिथिलेशच्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. गावाचे प्रमुख कारी साह यांच्या मुलीशी मिथिलेशचे प्रेम प्रकरण सुरु होते. 7 जूनला प्रेयसीच्या भावानं फोन करून मिथिलेशला बोलावले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. यातूनच त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी मिथिलेशचा मृतदेह सापडला त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्यांनी हसनपूर-सखवा मार्ग रोखून धरला होता. तसेच त्यांनी पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. यानंतर पोलिसांनी त्या लोकांना समजावत गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन देऊन शांत करून रस्ता मोकळा केला. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.