टीम हॅलो महाराष्ट्र । बिहारमध्ये गतवर्षी झालेल्या इनसिफिलायटीसमुळे शंभरहून अधिक बालकं दगावल्याचं चित्र समोर आलं होतं. असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील कोटा या ठिकाणी पहायला मिळाला आहे. राजस्थानमधील जे. के. लोन रुग्णालयात महिन्याभरात सुमारे १०० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांतच ९ बालकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाने आता गंभीर स्वरुप धारण केले आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याभरात या रुग्णालयात ७७ बालकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी ४ आणि ३१ डिसेंबर रोजी ५ बालकं या रुग्णालयात उपचारांदरम्यान दगावली आहेत. जन्मावेळी वजन कमी असल्याने हे मृत्यू झाले असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले आहे.
दरम्यान या प्रकरणावरून आता राजकारणही तापलं आहे. मायावतींनी काँग्रेस सरकारवर टीका केली असून भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “एका महिन्यांत १०० नवजात बालकांचा मृत्यू होतो आणि राजस्थानचे मुख्यमंत्र्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. कोटा इतकंही दूर नाही की सोनिया आणि राहुल गांधी इथं पोहोचू शकत नाहीत. तसेच ही घटना इतकीही साधारण नाही की मीडियानं काँग्रेस सरकारच्या या बेपरवाईकडे डोळेझाक करावी.
या प्रकरणावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही भाष्य केलं असून “मी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. आमच्याकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे त्यांना अश्वस्तही केले आहे.