हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर पारनेर येथे निलेश लंके (Nilesh Lanke) आणि सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला असल्याची बातमी समोर आली आहे. आज निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) राहुल झावरे याच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांचा विजय झाला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके यांचे समर्थक आमने-सामने भिडले. तसेच निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला सुजय विखे यांच्या आठ ते नऊ समर्थकांनी केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यांमध्ये सुजय विखे यांच्या समर्थकांनी राहुल झावरे यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. या मारहाणी मध्येच झावरे जखमी झाले आहेत. यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या घटनेनंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निलेश लंके यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. तसेच, या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण ही पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.