कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
कराडचा मूकबधिर विद्यार्थी अभिजीत डाळे याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया येथे निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय स्पर्धेत उंच उडीत गोल्ड मेडल मिळवल्यानंतर आता अभिजीतने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे.
अभिजीत डाळे हा कराड येथील डॉ. द. शि. एरम मूकबधिर विद्यालयाचा माजी खेळाडू आहे. तर विंग गावचा रहिवाशी असलेल्या अभिजीतने इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक मिळविले. त्यांनंतर आता ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या मूकबधिरांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही अभिजीतने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी घेतलेले ही भरारी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अभिजीत याने 1. 60 मीटर इतकी उंच उडी मारून सुवर्णपदक मिळवले. अभिजीतला क्रीडा शिक्षक व अथलेटिक्स कोच एन. टी. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अभिजीतच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी हनमसागर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. चिन्मय एरम, उपाध्यक्षा जयश्री गुरव, सचिव आफळे, दि कराड अर्बन बँकेचे एमडी दिलीप गुरव, अर्बन कुटुंब प्रमुख डॉ. सुभाष एरम, सुभाषराव जोशी यांच्यासह कराड विंग परिसरातील मान्यवरांनी व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.