औरंगाबाद – आपल्या मुलीचा कोवीशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचा दावा करत, औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या एका पित्याने एक हजार कोटींचे नुकसान भरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लस बनवणाऱ्या कंपन्यांनी तसेच सरकारनेही लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आणि मुलीचा मृत्यू झाला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार सोबतच निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. दिलीप लुणावत असे याचिकाकर्त्याचे नाव असून त्यांच्या कन्या डॉक्टर स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात होत्या. स्नेहल यांनी 28 जानेवारी 2019 रोजी लस घेतली. परंतु 1 मार्च 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या दाव्यानुसार कोरोना प्रतिबंधित लसी या संपूर्णता सुरक्षित असल्याचे म्हटले होते. परंतु खोट्या आणि चुकीच्या दाव यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या एइएफआय या समितीने मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्याचेही या याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळावा व इतर लोकांचे प्राण वाचावेत म्हणून आपण ही याचिका दाखल करत असल्याचे लुणावत यांनी म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.