औरंगाबाद | लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते फेडू शकत नसल्यामुळे एका रिक्षाचालक तरुणाने गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत यांच्या पार्थिवाला पत्नीने अग्नी डाग द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. तरुणाच्या इच्छेनुसार जड अंतकरणाने पत्नीने पतीच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.
भीमराव राघू साबळे (27 रा. राजीवनगर झोपडपट्टी), असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, भिमराव हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. लॉकडाऊन मुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडू शकत नव्हते. यातून आलेल्या नैराश्यातून रात्री ते अचानक पत्नीची साडी घेऊन रेल्वे स्टेशन पुलाच्या जवळील रेल्वे रुळाच्या दिशेने चालत गेले. तेथे एका झाडाला त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटना रात्री बारा वाजेच्या सुमारास पुलाखाली राहणाऱ्या लोकांना दिसली. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घाटीत दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याविषयी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुसाईड नोटमध्ये इच्छा
महेश साबळे यांच्या खिशात पोलिसांना सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला यामुळे कर्जाचे हप्ते फेडता येत नाहीत. आता मी कंटाळलो आहे माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्निडाग द्यावा, अशी त्याने इच्छा नमूद केली.