50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान शेतक-यांच्या खात्यावर कधी जमा करणार हे जाहीर करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलै पासून ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार होते, त्याला स्थगिती का दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना केला. तसेच फक्त ट्विट करत बसण्यापेक्षा पैसे जमा कधी करणार त्याची तारीख जाहीर करा असे आव्हान त्यांनी दिले.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचे निवेदन शिवसेना खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी एकनाथ शिंदे याना दिले होते. त्यांनतर पूरग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली होती. त्यांनतर राजू शेट्टी यांनीही ट्विट करत शिंदेंना उलट सवाल केला आहे.

मुख्यमंत्री महोदय नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांच्या खात्यावर १ जुलै पासून पैसे जमा होणार होते त्याला स्थगिती का दिली ? असच ट्वीट आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केले होते पण अखेर भ्रमनिरासच झाला शेतक-याचा विश्वास बसण्यासाठी ट्वीट करण्यापेक्षा शासन निर्णय करा व कधीपासून पैसे जमा करणार त्याची तारीखही जाहीर करा असं आव्हान राजू शेट्टी यांनी एकनाथ शिंदे याना दिले.

Leave a Comment