टीम हॅलो महाराष्ट्र । जेएनयूतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ल्याच्या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने पाठिंबा दर्शवला होता. यावरुन तिला अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यात विशेषकरून भाजपसमर्थित नेते,मंत्री आणि बॉलिवूडच्या काही कलाकारांचा समावेश आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील दीपिकावर शरसंधान साधले आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांसोबत उभी राहिली आहे आणि हा दीपिकाचा अधिकार आहे, अशा खोचक शब्दांत इराणी यांनी दीपिकावर टीका केली आहे. एका कार्यक्रमात उपस्थितीतांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
यावेळी इराणी म्हणाल्या, “मला जाणून घ्यायचं आहे की अखेर दीपिका राजकीयदृष्ट्या कोणाशी जोडली गेली आहे. ज्याने ही बातमी वाचली असेल त्या प्रत्येकाला हे जाणून घ्यायला आवडेल की दीपिका आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये काय करीत होती. जे लोक भारताचे तुकडे करु इच्छितात तसेच ज्या लोकांनी काठ्यांनी मुलींच्या गुप्तांगांवर प्रहार केला, अशा लोकांसोबत दीपिका उभी राहिली याचं मला आश्चर्य वाटलेलं नाही. भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी स्मृती इराणींच्या या टिपण्णीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
पुढे इराणी यांनी दीपिकाच्या २०११ च्या एका मुलाखतीच्या आधारावर दीपिका काँग्रेसची समर्थक असल्याचे सांगितले. तसेच ज्या लोकांना तिने जेएनयूत गेल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे, त्यांना ही गोष्ट माहिती नाही असेही त्या म्हणाल्या. याआधी भाजपा खासदार साक्षी महाराज यांनीही दीपिकाबाबत ती ‘टुकडे टुकडे गँग’सोबत गेली असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.
. @smritiirani takes down Deepika Padukone for supporting Bharat Tere Tukde Gang pic.twitter.com/XzqTmSjeaN
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 10, 2020