कराड | यशवंतनगर (ता.कराड) सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचलित सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांचेवतीने 35 वा पदवी प्रदान सोहळा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे शुभहस्ते आणि सह्याद्रि सहकारी कारखान्याचे संचालक व रहिमतपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासापीठावरुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंद्रजीत देशमुख साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी विद्यार्थी जीवनाचा पूर्ण आढावा, शैक्षणिक वर्षापासून करिअर निवडेपर्यंतचा प्रवास अगदी सरळ व सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांसमोर मांडला. माहितीचा बौध्दीक विकासामध्ये होणारा Information Knowledge Wisdom हा प्रवास अगदी सुरेख पध्दतीने मांडला. विद्यार्थी जीवनापासून व्यक्तीमत्वाचा विकास, सृजनशील जीवन व यातून समाज व राष्ट्रजागृती हा संदेश त्यांनी पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश माने यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा प्रवास मांडला. महाविद्यालयाच्या भव्य व सुसज्ज इमारत आणि वसतिगृह क्रिडागंण व इतर उपलब्ध सुविधांबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सुनिल राठोड यांनी केले. प्रा. अक्षता माने आणि प्रा.डॉ. भाग्यश्री जालगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. महेश बेले यांनी मानले.