नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे केजरीवाल यांनी कालपासून स्वत:ला आयसोलेट करुन घेतले होते. त्यांच्या सर्व नियोजित बैठकाही रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट झाली होती. या टेस्टचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता अरविंद केजरीवाल कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्यानं सर्वांच्या जीवात जीव आला आहे. मंगळवारी संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.
दरम्यान, दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ दिल्लीकरांनाच उपचार मिळतील, असा आदेश काढला होता. मात्र, नायब राज्यपाल यांनी हा आदेश रद्द केल्यामुळे दिल्लीत सध्या केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाची ठिणगी पडली आहे. दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यताही आज दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे. परंतु केवळ केंद्र सरकारच त्याची घोषणा करू शकते, असेही जैन यांनी सांगितले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”