दिल्ली पोलिसांनी उधळला ISISचा कट; एका अतिरेक्याच्या अटकेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री आयएसआयएसचा कट उधळून लावला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं मोठी कारवाई करत एका अतिरेक्याला अटक केली. अतिरेक्याला अटक करण्यापूर्वी मोठी चकमक झाली. मात्र, काही वेळातच पोलिसांनी अतिरेक्याला ताब्यात घेतलं. अबू युसूफ असं या अतिरक्याचं नाव असून, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून एक अतिरेकी फरार झाला आहे.

“धोला कुवा येथून एका आयएसआयएसच्या अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि अतिरेक्यामध्ये गोळीबार झाल्यानंतर ही त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ आयईडी बॉम्बसह शस्त्रसाठा आढळून आला असून, जप्त करण्यात आला आहे,” अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंह यांनी याविषयी माहिती दिली.

अबू युसूफ हा उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा रहिवाशी असून, दिल्लीत काही साथीदारांसोबत काम करतो. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेणं सुरू केलं आहे. त्याचबरोबर त्याच्या परिसरातही पोलिसांकडून छापे टाकण्यात येत आहेत. अतिरेक्याला अटक करण्यात आल्यानंतर लोधी कॉलनी येथील विशेष पथकाच्या कार्यालयात आणण्यात आलं आहे.अबू युसूफ याला अटक केल्यामुळे मोठा घातपाती कट उधळल्याची माहिती समोर येत आहे. या अतिरेक्याच्या निशाण्यावर दिल्लीतील काही प्रतिष्ठित व्यक्तीही होत्या असा सुरुवातीला कयास लावला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”