शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ‘ग्रेटा थनबर्गवर दिल्ली पोलिसांकडून FIR; भावना भडकावण्याचा केला आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ‘भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देत आहोत’ असं सोशल मीडियावर म्हणणाऱ्या स्वीडनची रहिवासी आणि ‘नोबल पुरस्कार’ विजेती १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी भावना भडकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात १५३ ए, १२० बी सहीत आणखीही काही कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

ग्रेटासहीत प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि प्रथितयश वकील मीना हॅरिस यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सोशल मीडियावरून पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन बुधवारी जाहीर करण्यात आलं.

‘यामागे काही हितसंबंधीय गट असून देशाच्या काही भागातील अवघ्या काही शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील सुधारणांबाबत शंका आहेत. या आंदोलनाबद्दल घाईघाईत प्रतिक्रिया देण्याआधी हा विषय समजून घेणं आवश्यक आहे’, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं. सोबतच, #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही तयार करून ते वापरण्यात आले. भाजपशी संबंधित अनेक नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून हे हॅशटॅग सोशल मीडियावर वापरले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment