दिल्लीच्या या टोळीला पकडण्यात नाशिक पोलीसांना यश
नाशिक प्रतिनिधी
गाडीमधून ऑईल गळती होत असल्याचे सांगत कारमधील पैशाची बॅग चोरणाऱ्या दिल्ली येथील टोळीला जेरबंद करण्यात नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. या टोळीकडून कारसह 8 लाख 75 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मुनियादी, बबलू फकिरा, किसन सेलूराज, करण गणेश आणि अभिमन्यू बबलू अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कार चालकाला तुमच्या गाडीतील ऑईल गळत असल्याचे सांगत चालक जेव्हा गाडीतून उतरून बोनेट उघडत असत तेव्हा कारमधील सीटवर असलेली पैशाची बॅग हे चोरटे लंपास करत असत. शहरातील चांडक सर्कल, एम जी रोड, पंचवटी आदी भागात या टोळीने चोऱ्या केल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात चोरांनी सोने, रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला होता.
वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात होती. एका घटनेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाले होते. पोलिसांनी हाच धागा पकडून संशयितांच्या गाडीच्या नंबरवरून शिर्डी येथून या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कारसह 8 लाख 75 हजारांचा चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.