भाजपा शिक्षक आघाडीची मागणी : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने 8 सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून कराड तालुक्यातील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

समाजातील महत्वाचा घटक असूनही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करूनही राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले आणि तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे, सर्व शिक्षकांना महिन्याच्या 1 तारखेला वेतन प्राप्त व्हावे, परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक, परिविक्षाधीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मानधन 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे, शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करा, सी.बी.एस.ई. शाळेतील शिक्षकांसाठी शाळा न्यायाधिकरणाची स्थापना करावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी जि.प. सदस्य सागर शिवदास, अनिल शिर्के, अशोक सोमदे, तानाजी पवार, विशाल साळुंखे, संतोष अंबवडे, शुभांगी कोरडे, भारती निकम यांच्यासह कराड दक्षिणमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment