औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद जिल्ह्यातून तडीपार करा आणि त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा असे निवेदन गुरुवारी (ता.3)आरपीआयचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना दिले आहे.
दलित चळवळीत कार्य करणारे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर विविध पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्यावर त्यांना तडीपार करण्यात येते. हद्दपार, मोक्का अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कायद्यांचा उपयोग करून कारवाई करण्यात येते. देशामध्ये कायदा हा सर्वांसाठी समान आहे. पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेस वेगळा कायदा व खासदाराला वेगळा असा विरोधाभास का? सवालही निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
इम्तियाज जलील हे शहरातील वातावरण गढूळ करतात, अधिकाऱ्यांना धमकावतात, शहरात दंगल निर्माण होईल असे वागतात, जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जाणीवपूर्वक भूमिका घेतात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कार्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे, जातीवादी विधाने करणे यामुळे औरंगाबाद शहरात भविष्यात दृहिकरण निर्माण होऊ शकते असा आरोपही यावेळी करण्यात आला.
इम्तियाज जलील यांच्यावर गेल्या एक-दोन वर्षात विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी जलील यांनी कामगार उपायुक्त कार्यालयात एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जी वागणूक दिली त्यावरून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी निवेदाद्वारे केली आहे.