कराड | गणेशोत्सवाच्या काळात तापदायक ठरणाऱ्या 165 संशयितांवर तात्पुरत्या हद्दपारीचे 146 प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यातील काही लोकांना उत्सव कालावधीत स्थानबध्द अथवा त्यांना शहर सोडून जाण्याचे बंधन घालण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवात 100 स्वंयसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना स्वतत्र गणवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पोलिस निरिक्षक पाटील म्हणाले, शहरात उत्सव काळात वेगवेगळ्या प्रकारची तयारी पोलिसांनी केली आहे. आगमन, उत्सव कालवधी व विसर्जनाचा टप्पा अशा तीन भागात त्याची विभागणी केली आहे. 146 प्रस्तावाव्दारे उपद्रवी ठरणाऱ्या 165 जणांना शहरातून तात्पुरते हद्दपार करावे अथवा त्यांना घरी स्थानबध्द करून त्यांच्या हालचाली नोंदवाव्यात असे त्यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. यापूर्वी गुन्हा केला आहे. मात्र शिक्षा भोगून येवूनही अशाच पध्दतीच्या गुन्ह्याच्या हालचाली असलेल्या 13 जणांवर आम्ही कारवाईचे प्रस्ताव दिले आहेत. त्यासह 50 अन्य संशयितांवरही वेगवेगळ्या कलमाव्दारे कारवाईचा प्रस्ताव आहे. दारू विक्रत्यांकडून उत्सव काळात चांगल्या वर्तवणुकीचे बॉण्ड घेण्यात आले आहेत. शहरातील पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांशी संपर्क साधून त्याची मदत घेण्यात येणार आहे.
घरगुती विसर्जनानंतर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तर विसर्जन मार्गावरही वेगळा बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी आम्ही आराखडा केला आहे. पोलिस 100 स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र पोशाख देण्यात आला आहे. त्यांच्याकडे प्रशासन व मंडळ समन्वयकाची भुमिका त्यांची असणार आहे. त्याशिवाय जलद कृती दलासहीत शिघ्र कृती दलाचे पोलिसही तैनात होणार आहेत. त्यासाठीही स्वतंत्र मागणी करण्यात आली आहे. विसर्जन मार्ग त्यादिवशी पूर्ण मोकळा ठेवला जाणार आहे.