व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का; जवळच्या नातेवाईकांच्या घरावर पुन्हा ईडीचा छापा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ईडीच्या वतीने राजकीय नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या दरम्यान काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर आज पुन्हा अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच छापा टाकला आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यामुळे अजित पवारांना धक्का बसला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावस भाऊ जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. जगदीश कदम यांच्या सहकार नगरमधील घरावर ईडीने धाड टाकली. विशेष म्हणजे ज्यावेळी ईडीच्यावतीने धाड टाकण्यात आली त्यावेळी जगदीश कदम हे मुंबई येथे होते.

ईडीच्यावतीने पहिल्यांदा राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी दौंड सहकारी साखर कारखान्याचाही त्यामध्ये समावेश होता. या कारखान्यावरही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते.