… म्हणून अजित पवारांनी थेट मुंबईच्या आयुक्तांनाच पुण्यात केले पाचारण

पुणे । पुण्यात कोरोना विरोधातील लढा अधिक प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतलाय. मुंबईतील कोरोना नियंत्रणाचे यशस्वी उपयोजना लक्षात घेत अजित पवारांनी थेट मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पुण्यात पाचारण केले आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत कोरोना नियंत्रणाचे धडे दिले. कोरोना नियंत्रणाच्या मुंबईतील अनुभवाच्या आधारावर इक्बाल सिंह चहल यांनी पुणे प्रशासनाला या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शहरासह जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करून कामात गतिमानता आणण्याची गरज इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केली.

पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक शनिवारी आढावा बैठक घेत आहेत. उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. असं असताना रुग्ण संख्या वाढण्याबरोबरच रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये सुधारणा करण्याची तंबी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली. सध्या पुण्यात लॉक डाऊन सुरू आहे. व्यापारी तसेच नागरिकांचा विरोध असताना लॉकडाऊन लागू करण्यात आला. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीकोनातून रिझल्ट दाखवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी चहल यांच्या हाती सूत्र दिली आहेत. आता कोरोना प्रादुर्भाव किती दिवसात आटोक्यात येतो, याकडे लक्ष आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ५० हजारांवर गेली आहे. मागील २ दिवसांत रुग्ण वाढीमध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकलं आहे. १५ जुलैला मुंबईत १३९० तर पुण्यात १४१६ रुग्णांची नोंद झाली. तर १६ जुलैला ही संख्या १४९८ आणि १८१२ अशी होती. अशा परिस्थितीत कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुण्याने मुंबईचं अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”