पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची तडकाफडकी बदली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मागील वर्षभरात कणखर भूमिका घेत कराडच्या गुन्हेगारी विश्‍वाच्या मुसक्या आवळणार्‍या कराडचे पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची गुरुवारी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. सुरज गुरव यांनी कराडचा पदभार स्वीकारून नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. अचानक बदली झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले असून या बदलीस ‘मॅट’मध्ये आव्हान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्यावर्षी 22 सप्टेंबर 2019 रोजी पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची नियुक्‍ती झाली होती. पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांना गेल्या महिन्यात सात सप्टेंबर रोजी कोरोनाची बाधा झाली होती. तेव्हापासून ते रजेवर होते. गुरुवारी ते पुन्हा सेवेत रुजू होणार होते. मात्र सकाळीच त्यांच्या बदलीच्या आदेशाची माहिती समोर आली.

कराड शहरात रात्री – अपरात्री वाढदिवस साजरा व्हायचा. मात्र कठोर कारवाई करत सुरज गुरव यांनी वाढदिवस सिलेब्रेशन करणार्‍यांच्या समाचार घेत थेट गुन्हे दाखल केले होते. व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब चॅनेलच्या माध्यमातून गुंडगिरीचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या युवकांसह गुन्हेगारी टोळ्यांचा सुरज गुरव यांनी चांगलाच समाचार घेतला होता. मोक्कासारख्या दोन कठोर कारवाई करत त्यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रावर पोलिसांनी चांगला अंकुश ठेवला आहे.

कराडची माणुसकी नावाचा ग्रुप तयार करून त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. या ग्रुपने कराड व परिसरात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांची कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली होती. दोन वर्षापूर्वी महापौर निवडीवेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर त्यांची तडकाफडकी चिपळूणला बदली झाली होती. तेथे वर्षभर सेवा बजावली असतानाच अचानक तेथूनही त्यांची थेट कराडला बदली झाली. कराडमध्ये एक वर्षाचा कालावधी होतो न होतो तोच त्यांची कराडातून तडकाफडकी नागपूरला बदली झाली आहे. त्यामुळे या बदलीला आव्हान दिले जाण्याची शक्यता पोलिस वर्तुळात व्यक्‍त केली जात असून पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या भूमिकेबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like