सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षी सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफजल खानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. हे अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी अफझल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी सापडल्या आहेत. या कबरी कोणाच्या यावर चर्चा सुरु असतानाच संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कणसे यांनी मात्र अफझल खान सोडून इतर कबरी नष्ट कराव्या अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन छेडेल असा थेट इशारा दिला आहे.
प्रदीप कणसे म्हणाले, अफझलखानच्या कबरीच्या शेजारी जे काही अतिक्रमण झालं होत ते हटवण्यासाठी ज्या हिंदुत्त्ववादी संघटनांनी लढा दिला आणि १० नोव्हेंबर या शिवप्रतापदिनी महाराष्ट्र सरकारने हे अतिक्रमण हटवलं याबाबत संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेकडून मी अभिनंदन करतो. संभाजी ब्रिगेड आणि हिंदुत्त्ववादी संघटना यांचं काही वैचारिक मतभेद असले तरी चांगल्या कामाला आमचा नेहमीच पाठिंबा राहील.
आता त्या कबरीशेजारी अतिक्रमण हटवल्या नंतर अशा काही बातम्या येत आहेत की अफझल खानाच्या कबरी शेजारी आणखी काही कबरी आहेत. त्या कबरी कोणा च्या आहेत याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच प्रतीक असलेल्या अफझल खानची कबर तिथेच ठेऊन बाकीच्या कबरी नष्ट करण्यात याव्या. प्रतापगड हा महाराजांचा किल्ला आहे, ते काही कब्रीस्थान नाही. त्यामुळे आगामी काळात या कबरी नष्ट केल्या नाहीत तर संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना यासाठी लढा देईल असा इशारा प्रदीप कणसे यांनी सरकारला दिला.