इंदू मिल या ठिकाणावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सतिश शिंदे

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा 20 वा वर्धापन दिन परळ येथे संपन्न झाला, त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री राज पुरोहित, कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, अजय चौधरी, समन्वय समितीचे नागसेन कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, 6 डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकर अनुयायांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध्‍ा करुन देण्यात येतील. तसेच 2020 नंतर आंबेडकर अनुयायांना रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी इंदू मिल येथील आंबेडकर स्मारक येथे सर्व सोयीसुविधा कायमस्वरुपी निर्माण करण्यात येतील. इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकामुळे मुंबईची नवीन ओळख तयार होणार आहे.

नागपूर येथील दीक्षाभूमीसाठी 100 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 40 कोटींचा निधी देण्यात आला आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी व मुंबईतील आंबेडकर स्मारक येथे जगातील अनुयायांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. मुंबईतील चैत्यभूमी व कुपरेज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कायमस्वरुपी भीमज्योतीची व्यवस्था करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक व्यक्तीमत्व आहे. बाबासाहेबांना सर्व विषयाचे ज्ञान होते. त्यांनी मानवता, बंधुता, समतेचा पुरस्कार करणारा धम्म दिला. या विचारांवर आधारित सर्वसमावेशक अशी राज्यघटना त्यांनी देशाला दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या कार्य अहवालाचे तसेच श्री.पावा यांच्या सम्बुद्ध या बुद्धगीतांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Comment