राज्य सरकारच्या जाहिरातींमध्येही पंतप्रधान मोदींचा फोटो हवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र सरकार तर्फे प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रशासकीय जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा, या मागणीचे पत्र विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या पत्रात फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला आहे.

शासकीय जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित केले जात नाही. वारंवार प्रकाशित झालेल्या जाहिरातींमधून ही गोष्ट निदर्शनास आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 13 मे 2015 आणि 18 मार्च 2016 रोजी याबाबत सविस्तर दिशानिर्देश आपल्या निकालपत्रात दिले आहेत, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही निर्णयांचा अभ्यास करुन राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे 11 ऑगस्ट 2017 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्या परिपत्रकाचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

परिपत्रकात शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, शासकीय संघटना यांच्या प्रत्येक जाहिरातीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे छायाचित्र असावे, असा स्पष्ट उल्लेख आहे. सद्यस्थितीत प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजने अंतर्गत हमीभावाने तूर खरेदीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. या योजनेतील 100 टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे. असं असतानाही केवळ मुख्यमंत्र्यांचेच छायाचित्र प्रकाशित केले जात आहे, असं फडणवीसांनी पत्रात लिहिलं आहे.

यापुढे प्रकाशित केल्या जाणार्‍या जाहिरातीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन व्हावे आणि तसे निर्देश आपण संबंधित विभागाला द्यावेत, ही विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Leave a Comment