हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, महायुती सरकारला राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वीकारली आहे. यासह त्यांनी आपल्याला पदातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे भाजपला आणि फडणवीस यांच्या समर्थकांना याचा मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातून मुक्तता करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी त्यांना फोन केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच याबाबत प्रत्यक्ष भेटून चर्चा करू असेही त्यांना सांगितले. त्यामुळे या भेटीसाठी लवकरच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आता शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निकालानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी “मला सरकारमधून मोकळं करावं. अशी मी विंनती करणार आहे. मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतो. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन.” असे वक्तव्यं केले आहे. या वक्तव्यामुळेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमके काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.